Monday, April 25, 2011

सुरुवात - पहिला दिवस

" आवडतो मज अफाट सागर , 
अथांग पाणी निळे, 
निळ्या जांभळ्या जळात केसर, 
सायंकाळी मिळे,
फेस फुलांचे सफेद शिंपित , 
वाटेवरती सडे ,  
हजार लाटा नाचत येती , 
गात किनार् या कडे. " 
आमच्या लहानपणी सहावीत असलेल्या  "सागर" ह्या  कुसुमाग्रजांच्या  कवितेचे यथार्थ दर्शन घडवणारा निळाशार समुद्र , स्वच्छ सुंदर किनारे लाभलेले गुहागर ( कोकण) डोळ्यात साठवून मन बस च्या पण वेगाने धावत होते. 
पाखरांच्या किलबिलाटाने सकाळी जाग येणे मुंबईत जेवढे दुरापास्त तेवढेच इकडे सर्रास. त्यात बुलबुलचा आवाज , सुतार पक्ष्याचा आवाज आणि ह्यात मिसळणारा हूप हूप असा भारद्वाजाचा आवाज सकाळ अगदी प्रसन्न करत होते. त्यांची निवास व्यवस्थाच मुली अजब होती. काही जण मोठ्या जुन्या आंब्याच्या झाडावर , तर काही जण परसातल्या केळीवर , फणसाच्या झाडावर अगदीच काही चिमण्या आणि बुलबुल मधूनच जांब च्या झाडावर चक्कर मारत होते. अशी हिरवीगार सकाळ आत्तापर्यंत ऐकून ,वाचून होतो ती " याची देही याची डोळा " अनुभवताना एक चेतना रोमरोमात उभारून येत होती. याला हल्लीच्या भाषेत "मस्ती" म्हणतात. 
clicked from 2nd floor - House - Mr Khare

मुंबईतले पुढचे घाई गर्दीचे दिवस सुखात जावेत म्हणून आम्ही सगळेच ह्या मोकळ्या हवेचा श्वास निसर्गातून भरून घेत होतो.

युथ होस्टेल ने आयोजित केलेल्या आमच्या छोट्या सुट्टीची सुरुवात ठाणे ते गुहागर बस प्रवासाने झाली. कोकणातल्या चिंचोळ्या, नागमोडी रस्त्यांवरून धावणाऱ्या छोट्या बस मध्ये पाठ टेकायला जरी त्रास झाला तरी प्रसन्न सकाळ अनुभवून श्रम परिहार झाला. दोन्ही बस मिळून आम्ही ४०-४५ जण होतो. 
चहा पान आणि जेवण खाण जोशी काकून कडे होते. थोडा वेळ आराम करून गरम गरम उपमा खावून , चहा पिवून आम्ही समुद्राचे दर्शन घेण्य साठी पारस दारातून  निघालो. पुढे लावलेल्या जास्वंदी , तगर , मोगरा , जायफळ, माड, पोफळीच्या वाडी ने आमचे स्वागत केले.मधूनच खोल खोल असलेल्या विहिरी दिसत होत्या.
झाडीतून बाहेर येऊन पहिले असता समोर पसरलेला विशाल सागर आणि समुद्राची शुभ्र रेती , जसे जसे पुढे जाऊ तसे तसे रेतीतून बाहेर येणारे छोटे छोटे खेकडे माणसाना पाहून परत त्यांच्या मातीच्या घरात धावत होते.हौस पूर्ण होई पर्यंत पाण्यात डुबक्या मारल्या जात होत्या. किनार् या वरून दिसणारे निसर्गाचे दृश्य मी कॅमेरात कैद करून घेतले होते. परत येताने जवळचेच दुर्गा देवी चे मंदिर पहिले कोकणातल्या मंदिराचा रंग वर्ष्यानुवरशे टिकतो कारण प्रत्येक सण वारानुसार त्याला रंगाचा नवीन हाथ मारला जातो. मंदिराच्या आवारात लावलेली काही रंगीत फुले पाहून समाधान वाटले.  

जोशी काकून कडचे दुपारचे जेवण फारच सुंदर होते. त्यांच्या आग्रहाने जेवणाची गोडी आणखीन वाढली होती. साखर आंबा , कैरीची चटणी , ताक, गरम गरम पोळी भाजी, नारळाच्या दुधात बनवलेली कैरीची कढी, इतक खावून तृप्त ढेकर देत आम्ही थोडे विसावलो.तीन दिवसाच्या जोशी काकूंच्या आग्रहाला सलाम.  

अर्ध्यातासाच्या विश्रांती नंतर आमचा लवाजमा गोपाल गडावरच्या वरच्या  स्वारी साठी सज्ज झाला. गुहागरच्या उत्तरेला असलेला हा किल्ला आणि ह्याचे दगडी बुरुज आपली ओळख  टिकवून उभे आहेत. सागर तटाचे मनोहारी दृश्य ह्याच्या दोन्ही बाजूनी दिसते. पण हा किल्ला सरकार खजिन्यात नसून एका खासगी मालका कडे आहे. किल्ल्याच्या आत १ मोठी पाण्याची टाकी आहे . किल्ल्याकडे कूच करताना वाटेत दाभोळ वीज प्रकल्प दिसतो (एनर्ओंन). 
भ्रष्ट राजकारणात भारतच्या विकासाचाही काना कसा मोडतो ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
नंतर आमचा मोर्चा अंजनवेल मधल्या ताकालेश्वर लाईट हाउस  पाशी आला. हे लाईट हाउस उंच डोंगराच्या कडेला उंच चबुतरया वर बांधलेले आहे. ह्याच्या रचने मध्ये १० प्रिझम चे वर्तुळाकार तुकडे आहेत ज्यांच्या मुळे रात्रीच्या वेळी समुद्रातील जहाजांना दिशा दाखवता येते (सिग्नल देता येतो) . भौतिक शास्त्रातील "प्रकाशाचे परिवर्तन " हा सिद्धांत ह्या यंत्रासाठी वापरला आहे. भारत सरकारने दर ३० कि मी सागर तीरावर असे लाईट हाउस प्रस्थापित केले आहेत.

"माणूस जर एकलकोंडा  झाला तर त्याला जमावाची भीती वाटायला लागते आणि मग तो उद्धट वर्तन करतो "ह्याची प्रचीती इथल्या मशीन चालवणाऱ्या व्यक्ती वरून आली.
पहिल्या दिवसाचा आमच्या प्रवासातील शेवटचा टप्पा म्हणजे धोपाव जेट्टी मार्गे दाभोळ च्या चंडिका मातेचे दर्शन. बच्चे कंपनीला प्रमुख आकर्षण होते ते फेरी बोट मधून प्रवास. जेट्टी च्या आसपास सार्वजनिक शौचालय हा प्रकार न्हवता. पर्यटन विकास मंत्रालयाला बहुतेक ते बांधण्यात काही रस नसावा किंवा पर्यटकांची गैरसोय त्यांची आवड असावी.(ह्याला कोकणचा विकास म्हणतात)
जेट्टी पर्यंत बस ने आल्यावर पुढे बस सकट सगळे जण फेरी बोट मध्ये बसलो. फेरी बोट च्या अर्ध्याभागात वाहन तळ असतो तर निम्म्या भागात दुमजली प्रवासी असने असतात. ७- ९ मिनिटाच्या प्रवासात पण आईस क्रीम विक्रेते आणि इतर खाद्यपदार्थ विक्रेते होतेच. पलीकडे परत डोंगराळ भागातून बस ने प्रवास करून एकदाचे आम्ही एका मंदिरा पुढे उतरलो . मंदिराचे छप्पर पत्र्याचे होते.आत गेल्यावर सभागृह होते. आणि पुढे एक गुहा होती त्यात चंडिका मातेची स्वयंभू मूर्ती होती. संध्याकाळच्या समयांच्या प्रकाशात मूर्ती तेजस्वी भासत होती. दर्शन घेऊन मूर्तीच्या मागून बाहेर येता  येते. गुहेची उंची कमी असल्याने वाकूनच जावे लागते. मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी बऱ्याच नवसाच्या घंटा बांधलेल्या होत्या. परत फेरी बोट करून गुहागरला परतलो. रात्रीचे जेवण करून झाल्यावर निद्रा देवीच्या केव्हा अधीन झालो ते कळलेच नाही.

शब्दांकन - कौस्तुभ देशपांडे
     छायाचित्रकार - कौस्तुभ देशपांडे




2 comments:

  1. गुहागरचा वरचा पाट (वाडीच नाव) मला खूप आवडतो. आटोपशीर घर, त्यामागची वाडी, सागराची गाज ऐकू येता येता त्याचे होणारे दर्शन. दुर्गादेवी, उफराटा गणपती, प्रेमळ लोक. खरतर यातून कधी बाहेरच पडू नये असा वाटत, पण पोटापाण्यासाठी हे सर्व सोडून बाहेर पडाव लागत.

    अजूनही त्या तरल आठवणी मनात रुंजी घालताहेत.

    ReplyDelete
  2. मस्तच मधुकर , हा वरचा पाट आणि खालचा पाट हि भागाची नवे आहेत ना?

    ReplyDelete